'आई, मी थोडा वेळ
खेळायला जाऊ?'
आलास का शाळेतून,
आता आवरून घे पाहू
'आई, मी थोडा वेळ
खेळायला जाऊ?'
पेपर कोणते मिळाले आणि
किती मिळाले मार्क्स?
अरे दहा मिनिटात आहे तुझा
गणिताचा क्लास
आत्ताच आलो ना ग,
थोडा टीव्ही दे न पाहू
'आई, मी थोडा वेळ
खेळायला जाऊ?'
कपडे बदल लवकर नि घे
अभ्यासाची वही
हात दुखतायत वगैरे काही
चालायचे नाही
थोडा वेळ मित्रां बरोबर
सायकल चालवून येऊ?
'आई, मी थोडा वेळ
खेळायला जाऊ?'
डबा का रे नाही संपला?
तशीच आहे पोळी
गेला असशील ना खेळायला
सुट्टीच्या वेळी?
संध्याकाळी असतात क्लास
मग कधी ग मी खेळू?
'आई, मी थोडा वेळ
खेळायला जाऊ?'
अरे टेनिसच्या क्लास मध्ये
खेळायचंच आहे
आणि तबल्याला कोण तुला
अभ्यास विचारणार आहे?
अगं सारखं काय शाळा नाहीतर
क्लास मधेच राहू?
'आई, मी थोडा वेळ
खेळायला जाऊ?'
अष्टपैलू व्हायला हवं,
तुला माहित नाही जग
मेहनत घेशील आत्ता
तरच धरशील तग
सगळे धावतायत म्हणून
मी ही का धावतच राहू?
'आई, मी थोडा वेळ
खेळायला जाऊ?'
मान्य आई वाटतंय तुला,
मी व्हाव अष्टपैलू
पण तुम्हा सार्यांच्या अपेक्षा
मी एकटा कसा पेलू?
मन कश्यात रमतं माझं
ते मलाच द्या न शोधू
'आई, मी थोडा वेळ
खेळायला जाऊ?'
बांधलेला दिवस माझा,
आखलेला वेळ
एकदा तरी सांग मला,
आज मनसोक्त खेळ
नाहीतर मोकळा श्वास
मी तरी केव्हा कसा घेऊ?
'आई, मी थोडा वेळ
खेळायला जाऊ?'
संकलन-अभिजीत पाटिल
Post a Comment