गुंठा गुंठा जमीन विकून आज
गोफ आलाय गळ्यात
पण एक प्लेट मातीचा वास हुंगायला
उद्या रक्त येईल डोळ्यात
काळ्या आईच्या तळतळीचा
हा दागिना किती दिवस जाईल ?
हाच सोन्याचा हार
उद्या गळ्यातला फास होईल
निबंधक कार्यालयात
बहिणीचा हक्कसोड करून घेतला म्हणून
मनातल्या मनात
किती भयानक हसतो आपण ?
बापाचा अंगठा मिळावा म्हणून
आईचंही कुंकू पुसतो आपण
जन्माच्या सातबाऱ्यावर
बोजा चढला काय
आणि उतरला काय
जित्या माणसांच्या काळजात
बघा ना किती फेरफार झालाय !
सपरातून बंगल्यात आलो
म्हणजे काय शेणसड्याचं पुनर्वसन झालं ?
मळलेलं अंग झाकलं म्हणजे काय
सुरकुत्यांचं जागतिकीकरण झालं ?
ज्या दिवशी आपल्या गावाचं टाऊन झालं
त्याच दिवशी बघा ना
माणसाचं मार्केट किती डाऊन झालं !
भूक आहे तशीच आहे
पण भाकर बघा ना
कशी मॉलमधल्या काचेमध्ये करपून गेली
आभाळाएवढी तहान
एका बाटलीत झिरपून गेली
सायबर कॅफेत मांडीवर बसून
चिमण्या पिल्लांनी आईला
कसा मागायचा चुलीवरचा घास ?
अत्तराच्या बाटलीत सांगा ना
भरता येतो का मातीचा वास ?
संकलन -अभिजीत पाटील
Post a Comment