प्रसिद्ध पत्रकार आणि ज्येष्ठ कीर्तनकार हभप शामसुंदर महाराज सोन्नर यांची कविता विधानसभा आणि विधान परिषदेत गाजली.
विधानसभेत सिन्नरचे आमदार झोरे आणि विधान परिषदेत आमदार जयंत जाधव यांनी वाचून दाखविली.
गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील  लाखो शेतकऱ्यांची मुले आणि त्यांच्या कष्टाचा सन्मान करणार्‍या संवेदनशील नागरिकांनी ही पोस्ट शेअर केली म्हणून विधिमंडळात पोहोचली.


मेला माझा नवरा जरी
मला नका भेटू.
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..
.
लाल दिव्याच्या गाडीतून
येईल तुमचा ताफा..
कॅमेर्‍यात बघून बघून
मारल्या जातील थापा..

पांढरा धोट रुमाल काढून
डोळेसुद्धा पुसाल..
पोरक्या माझ्या पोरांना
खेटून खेटून बसाल..

खोटाखोटा कंठ तुमचा
नका देऊ दाटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..

धनी माझं गुणाचं
शेतामधी खपायचं..
अर्ध्या पोटी राहून सुद्धा
इभ्रतीला जपायचं..

काळ्या माईची वटीभराया
कर्ज थोडं काढलं..
पीक गेलं जळून पण
कर्ज मात्र वाढलं..

सावकार लागला छळू
तवा धीर लागला सुटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..

पोरगं जातय साळात
त्याची फीस नाही भरायला..
जनावरं दारात उभी
चारा नाही चारायला..

विहीर कधीच आटून गेली
बोरला नाही पाणी..
करपलेल्या पिकाकडं
पाहत राहायचं धनी..

सरकार झालय कोडगं
अन सावकार लागलेत लुटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..
.
रातच्याला जवळ घेऊन
लई गोड बोललं..
डोळ्यांत दिसलं पाणी
तवा काळीज माझं हलल..

जाग आली पाहटं तवा
जवळ नाही दिसलं..
फंख्याला फाशी घेऊन
कुंक माझं पुसलं..

खोटे अश्रू डोळ्यात आणून
आता नका चुटपूटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..

धनी होतं तवा कुणी
धीर नाही दिला..
आता किती तातडीने
पंचनामा बी केला..

कॅमेरे घेऊन पांढर्‍या गाड्या
आल्या दारामंदी..
आभाळ फाटलंय आमच
यांना प्रसिद्धीची संधी..

म्हणे जग लई सुधारलय
परं माणुसकी लागलीय आटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..

होईल घोषणा पॅकेजची
मदतीचा चेक येईल..
माझ्या लेकरांचा बाप
कोण आणून देईल..

धनी जरी गेलं तरी
मी न्हाई हारायची..
पोरांना करून पोरकं
मी न्हाई मरायची..

तुमचं मात्र थांबवा ढोंग
मला नका भेटू..
माझ्या
पोरा संग बसून
नका काढू फोटू..

  संकलन -तानाजी बंडसोडे.

थोडसे माझ्याबद्दल ……

Post a Comment

 
Top
X